नवरात्रातील नऊ दिवसांचे रंग कोणते असावेत? याबद्दल कोणत्या पोथी-पुराणात उल्लेख आहे का? आणि दरवर्षी हे वेगवेगळे रंग कोण ठरवितात? याला काही मान्यता आहे का? असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील. त्याचीच उत्तरे जाणून घेण्याचा हा प्रयत्न.
नवरात्रातील नऊ दिवसांचे रंग (नवरात्र रंग) हे भारतात विशेषतः महाराष्ट्र, गुजरात, आणि उत्तर भारतात फार महत्वाचे मानले जातात. अनेक उपासक या रंगांची वस्त्रे परिधान करुन (विशेषतः महिला) देवीची उपासना करतात.
🌍 नऊ दिवसांचे रंग कोणते असावेत याबद्दल कोणत्या पोथी-पुराणात उल्लेख आहे का?
तर नाही ! शास्त्रीय दृष्टिकोनातून देवी भागवत, मार्कंडेय पुराण, दुर्गा सप्तशती इ. ग्रंथात या नऊ दिवसांसाठी विशिष्ट रंगांचा उल्लेख आढळत नाही. देवीची पूजा कशी करावी? कोणते मंत्र वापरावेत? कोणते रूप पूजावे? याचे वर्णन शास्त्रात आहे, पण नवरात्र उत्सवात नऊ दिवसांसाठी विशिष्ट रंग वापरण्याविषयी वर्णन आढळत नाही. त्यामुळे नवरात्रीचे नवरंग हा आधुनिक समाज-परंपरेचा भाग आहे असे मानले जाते.
🌍 हे रंग कसे ठरवितात?
नवरात्रातील रंग दरवर्षी वारांनुसार ठरवले जातात (रविवार, सोमवार इ.) आणि या निश्चितीमागे ज्योतिष्यशास्त्रीय ग्रह-नक्षत्र विचारांचा आधार घेतला जातो, उदा. सोमवारपासून जर नवरात्र सुरू होत असेल तर, त्या दिवसाचा रंग शुभ्र असेल (चंद्र ग्रहाचा वार सोमवार, शुभ्र वर्ण) त्याप्रमाणे पुढील दिवसांचे रंग, याप्रमाणे ग्रह-नक्षत्रांचा विचार करुन रंग निश्चित केले जातात.
🌍 दरवर्षी हे रंग कोण ठरवितात?
काही धार्मिक नवरात्र उत्सव मंडळे, देवस्थान, ट्रस्ट, पंचांग संकेतस्थळे यांचेकडून हे रंग निश्चित केले जातात. आणि सामाज-माध्यमे, धार्मिक संस्था आणि विविध माध्यम-समूह यांद्वारे हे रंग जाहीर होतात.
🌍 याला काही शास्त्रीय मान्यता आहे का?
शास्त्रीय धार्मिक ग्रंथांमध्ये याला आधार नाही. मात्र, अलिकडील काळात समाजशास्त्रीय आणि सांस्कृतिकदृष्ट्या या रंगांची प्रथा लोकमान्य झाली आहे. हे रंग नवदुर्गेच्या शैलपुत्री, ब्रह्मचारिणी...इ. रूपांशी आणि त्या त्या रूपाच्या शांती, शक्ती, विजय अशा प्रतीकात्मक गुणांशी जोडलेले असतात.
🌍 सारांश :
🔷 नवरात्रातील नऊ दिवसांचे रंग शास्त्रीय पोथ्यांतून आलेले नाहीत.
🔷 ते वार आणि ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारावर दरवर्षी वेगवेगळे असतात.
🔷 कोणतीही अधिकृत संस्था नसली तरी समाज, मीडिया, आणि धार्मिक परंपरांद्वारे हे ठरवले जातात.
🔷 ही एक शुद्ध भक्ती आणि एकतेचे प्रतीक असलेली लोकपरंपरा आहे.
यंदाच्या (२०२५) शारदीय नवरात्रीसाठी एनडीटीव्ही मराठी व लोकसत्ता माध्यम समूहांनी प्रसिद्ध केलेले नऊ दिवसांचे रंग याप्रमाणे आहेत :
१) २२ सप्टेंबर : शैलपुत्री पांढरा
२) २३ सप्टेंबर : ब्रह्मचारिणी लाल
३) २४ सप्टेंबर : चंद्रघंटा निळा (रॉयल ब्ल्यू)
४) २५ सप्टेंबर : कुश्मांडा पिवळा
५) २६ सप्टेंबर : स्कंदमाता हिरवा
६) २७ सप्टेंबर : कात्यायनी राखाडी (ग्रे)
७) २८ सप्टेंबर : कालरात्रि केशरी /नारिंगी (ऑरेंज)
८) २९ सप्टेंबर : महागौरी मोरपंखी हिरवा (पिकॉक ग्रीन)
९) ३० सप्टेंबर : सिद्धिदात्री गुलाबी (पिंक)